चेन्नई सुपर किंग्जच्या टीमला चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळतं. यामागचे एक कारण म्हणजे या टीमचं खेळणं क्रिकेट आणि दुसरे कारण म्हणजे या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे, पण आयपीएल 2022 च्या लिलावानंतर वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. आयपीएल 2022 मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात यशस्वी खेळाडू सुरेश रैना अनसोल्ड राहिला. सीएसकेने आपल्या इतर सर्व खेळाडूंना संघात परत घेण्यासाठी प्रयत्न केले. काहींना घेतले देखील मात्र आयपीएल इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सुरेश रैनासाठी त्यांनी बोली लावली नाही. याचे पडसाद सोशल मीडियावर दोन दिवस उमटत होते. सुरेश रैनासाठी भावनिक झालेले चाहते सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त करत होते. आज देखील #Boycott_ChennaiSuperKings हा ट्रेंड ट्विटरवर जोरदार ट्रेंड करत आहे. मात्र या चेन्नई सुपर किंग्जवर बहिष्कार घालण्याची भाषा करणारा हा ट्रेंड सुरेश रैनासाठी नाही तर श्रीलंकन खेळाडू महीश तीकशाना याच्यामुळे सुरू आहे